02/11/2022
काही तांत्रिक कारणांमुळे आम्ही Indradhanu,Devgad पेज सुरू केले आहे या पुढे सगळे पोस्ट Indradhanu,Devgad या पेज वर होतील. आपणास विनंती आहे आपण या पेज ला like आणि Follow करावे
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*'इंद्रधनू देवगड...'*
*यशाची कीर्तीवंत वाटचाल!*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*'सर, मला तुमच्या नवरात्र उत्सवाचे काही व्हीडिओ, फोटो पाठवाल का? माझ्या छोट्या मुलीला दाखवायचे आहेत. तुमच्याकडचा नवरात्र उत्सव खूप दर्जेदार, नियोजनबद्ध आणि चांगला असतो...'* हा व्हॉटस्अप मॅसेज मालवणमधील एका उद्योजकाचा आहे. आमच्या एका सदस्याने 'स्टेटस्'ला ठेवलेल्या यंदाच्या नवरात्र उत्सवाच्या व्हीडिओ, फोटोला आलेली त्या उद्योजकाची एक दिलखुलास दाद ! खरंतर, 'इंद्रधनू- देवगड' या संस्थेला मिळालेली ही लोकप्रियता काही एका दिवसामधील नाही. यामागे तब्बल आठ वर्षांचे तप आहे. 'तरुण भारत'चे देवगडमधील पत्रकार व हौशी मित्रांनी आठ वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या एका संस्थेने समाजसेवेचा घेतलेला वसा आज आठव्या वर्षीही यशाची कीर्तीवंत वाटचाल करीत आहे.
ज्या समाजात आपण वावरतो, त्या समाजाला आपण काही देणे लागतो, या उदात्त भावनेने 'तरुण भारत'चे देवगडमधील पत्रकार व देवगडातीलच विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या हौशी मित्रांनी एक संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला. संस्थेचा अध्यक्ष कोण असणार नाही. एक विचाराने, एकदिलाने संस्था चालवायची. सर्व सदस्य हेच संस्थाध्यक्ष असतील. कार्यक्रम आयोजित केले, तर २/३ सदस्य त्या कार्यक्रमाचे प्रमुख असतील. अशा अनेक नियमांच्या बंधनात दि. २ नोव्हेंबर २०१५ रोजी 'इंद्रधनू प्रेस क्लब, देवगड' ही संस्था स्थापन झाली. आकाशात सप्तरंगाचे क्षितिज तयार करणाऱ्या 'इंद्रधनुष्या'प्रमाणेच आपली संस्था समाजात सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा क्षेत्रात अग्रेसर राहावी, या भावनेतून संस्थेला 'इंद्रधनू' हे नाव देण्यात आले. या संस्थेला समाजात स्वतंत्र ओळख निर्माण करून देण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावे लागणार, हे निश्चित होते. यावर विचारमंथनही झाले. उपक्रम राबवायचा, मग आर्थिक गणिते आली. पण, ही आर्थिक गणिते प्रथम आपण आपल्या खिशातील पैशांनी जुळवू, या विचाराने प्रत्येक सदस्य दरमहा संस्थेसाठी आपले आर्थिक योगदान देऊ लागले आणि कालांतराने ठराविक निधी संस्था सदस्यांच्या स्वनिधीतून जमा झाला.
संस्था स्थापनेनंतर संस्थेने पहिला उपक्रम राबविला तो 'दिनदर्शिकेचा..' पण, ही दिनदर्शिका वेगळी असावी, या विचाराने संस्थेने १ जानेवारी २०१६ रोजी 'पर्यटन दिनदर्शिका' प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला. दिनदर्शिकेमध्ये देवगड तालुक्यातील पर्यटन स्थळांची माहिती, छायाचित्रे प्रकाशित करण्यात आली. यासाठी संस्थेला देवगडमधील व्यावसायिक, उद्योजकांनी जाहिरात स्वरुपात केलेले सहकार्य मोलाचे ठरले. तर, आमच्या संस्थेचे सदस्य छायाचित्रकार वैभव केळकर यांच्या नजरेतून कॅमेराबद्ध झालेल्या पर्यटन स्थळांच्या छायाचित्रांमुळे 'पर्यटन दिनदर्शिका' अधिक दर्जेदार ठरली. संस्थेच्या या पहिल्याच उपक्रमाचे देवगडवासीयांनी तोंडभरून कौतुक केले. त्यामुळे संस्थेने लोकप्रियतेची पहिली पायरी गाठली. आजही 'पर्यटन दिनदर्शिका' हा उपक्रम सुरू असून गेली दोन वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन स्थळे या दिनदर्शिकेच्या माध्यमातून प्रकाशझोतात आणली जात आहेत.
संस्थेमार्फत रक्तदान शिबिर, आकाश कंदील स्पर्धा, ग्रीटिंग कार्ड स्पर्धा घेण्यात आल्या. देवगडमध्ये अनेक वर्षापासून बंद अ सलेला 'आनंद मेळा' ही संस्थेने २६ जानेवारी रोजी पुन्हा सुरू केला. यात महिलांसाठी पाककला स्पर्धा, 'खेळ पैठणीचा, बहुमान देवगडच्या सुनबाई'चा, फनीगेम्स आदी कार्यक्रम घेण्यात आले. गणेशोत्सवात गणेश सजावट स्पर्धा घेण्यात आल्या. शासकीय कार्यक्रमातही संस्थेने सहभाग घेतला. मतिमंद मुलांसाठी सहलीचे आयोजनही संस्थेने केले.
संस्थेला सुरुवातीपासून आधार मिळाला, तो कुळकर्णी सुपर शॉपीचे मालक सुनीलभाई कुलकर्णी यांचा. संस्थेच्या अडीअडचणीच्या काळात त्यांचे सहकार्य व मार्गदर्शन नेहमीच मिळत असते. 'इंद्रधनू'चा कोणताही कार्यक्रम असू दे... कुळकर्णी सुपर शॉपीचे जयराम राऊळ व त्यांचे कुटुंब, जामसंडे येथील दिर्बा- रामेश्वर बॅटरीज' चे अमोल वंजारे यांची मदत कायमच असते. संस्थेने किड्स फॅशन शो, खाऊगल्ली, दहिहंडी उत्सव यासारखे उपक्रमही राबविले. गरीब मुलींच्या मदतीसाठी शालेय विद्यार्थिनी एमा संदीप कुळकर्णी हिच्या पुढाकाराने संस्थेने 'माणुसकीचे दुकान' ही संकल्पना राबविली. चिपळूण येथील पूरग्रस्तांना संस्थेने मदतीचा हात दिला. देवगड तालुका व्यापारी पर्यटन संस्थेच्या 'जल्लोष' महोत्सवातील स्पर्धात्मक उपक्रमांना संस्थेचे सहकार्य असते. नवरात्र हा खरंतर नऊ दिवसांचा उत्सव! पण, 'इंद्रधनू' संस्था नवरात्र उत्सव बारा दिवस साजरा करते. शहरातील मध्यवर्ती ठिकाणच्या अनुसया कॉम्प्लेक्स येथे गरबा नृत्य, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, दांडिया स्पर्धा घेतल्या जातात. *सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या क्रमांकाचा गरबा म्हणून 'इंद्रधनू' च्या नवरात्रोत्सवाची विशेष ओळख निर्माण झाली आहे.*
संस्थेची यशस्वी वाटचाल सुरू असल्यामुळे ही संस्था शासन दरबारी नोंदणीकृत (रजिस्टर) करणे आम्हाला गरजेचे होते. त्यामुळे दि. २६ मे २०२२ रोजी संस्था नोंदणीकृत करण्यात आली. यातही 'प्रेस क्लब', 'फ्रेंडस् क्लब' या जोडनावांना संस्था नोंदणीकृत करताना अडचणी येऊ लागल्याने 'इंद्रधनू- देवगड ' अशा सरळ सोप्या नावाने संस्था नोंदणीकृत करण्यात आली.
*आज संस्थेला आठ वर्षे पूर्ण होत आहेत. आतापर्यंत देवगडवासीयांनी संस्थेला जशी आपुलकीची, प्रेमाची साथ दिली, तशीच साथ यापुढेही मिळो हीच अपेक्षा!*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*इंद्रधनू देवगड (रजि.)*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹